Tuesday, 30 July 2013


आपली आकाशगंगा
 
आपली पृथ्वी ज्या सूर्यमालेमध्ये आहे ती 'मंदाकिनी' नावाच्या आकाशगंगेमध्ये आहे. अवकाशातील सर्वच गोष्टीचे एकमेकांपासून अंतरच फार असल्याने दोन अवकाशीय गोष्टींमधील अंतर प्रकाशाच्या वेगाने मोजले जातात. आपल्या पृथ्वीवरून दिसणार्‍या जवळपास सर्वच गोष्टी आपल्या आकाशगंगेमधील आहेत याचाच अर्थ आपल्या आकाशगंगेचा आकार प्रचंड मोठा आहे.
थोडक्यात प्रकाशाच्या वेगाची आपणास कल्पना द्यायची झाल्यास सूर्यापासून निघालेल्या प्रकाशाला पृथ्वी पर्यंत पोहोचायला ८ मिनिटे लागतात व प्लुटो पर्यंत पोहोचायला ५ तास लागतात. त्यानंतरच्या सर्वात जवळच्या तार्‍याजवळ प्रकाशाला पोहोचायला ४ वर्ष लागतात. तर या सर्वांना सामावून घेणार्‍या आकाशगंगेच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत प्रकाशाला पोहोचायला जवळजवळ १ लाख वर्षे लागतात.
आपल्या आकाशगंगेमध्ये साधारण २०० अब्ज तारे आहेत. आपल्या आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यापेक्षा लहान तसेच आपल्या सूर्यापेक्षाही हजारो पट आकाराने मोठे तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, वायूचे ढग, धुळीचे ढग, मृत तारे, नवीन जन्माला आलेले तारे अशा अनेक गोष्टी आहेत.
आपल्या आकाशगंगेच्याच जवळ एक लहान व एक मोठा असे विस्कटलेले असे दोन ढग आहेत. मॅगेलीन या खलाशाने ते सर्वप्रथम पाहिल्याने त्यांना मॅगेलीनचे ढग असे नाव देण्यात आले आहेत. त्यानंतर आपल्या आकाशगंगेच्या जवळ असलेली आकाशगंगा 'देवयानी' या नावाने ओळखली जाते. पृथ्वीवरून पाहताना ती देवयानी तारकासमुहामध्ये दिसत असल्याने 'देवयानी' हे नाव देण्यात आले. आपल्या आकाशगंगेपासून जवळपास २२ लाख प्रकाशवर्षे अंतरावर ही 'देवयानी' आकाशगंगा आहे.
आपली आकाशगंगा ज्या इतर आकाशगंगांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला स्थानिक दिर्घिका समूह ( Local Group of Cluster) असे म्हटले जाते या स्थानिक दिर्घिका समूहामध्ये आपली आकाशगंगा मिळून इतर ३० दिर्घिका आहेत. आकाराने लहान मोठ्या असलेल्या ह्या आकाशगंगा जवळपास १ कोटी प्रकाशवर्षे एवढ्या अंतरामध्ये पसरलेल्या आहेत.
अनेक आकाशगंगा तसेच त्यांचे स्थानिक समूह मिळून त्यांचा महासमुह ( Super Cluster) तयार होतो. अशा महासमुहाचा व्यास जवळपास १०*८ प्रकाशवर्षे एवढा मोठा असतो. आपली आकाशगंगा असलेला स्थानिक समूह कन्या दिर्घिका समूहाचा भाग आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजाप्रमाणे विश्वामध्ये अशाप्रकारचे कोट्यवधी महासमुह आहेत.

आकाशगंगेचे प्रामुख्याने तीन भाग पडतात. 
१) सर्पिलाकार -
ह्या प्रकारामध्ये गोल सर्पाप्रमाणे पसरलेल्या भुजा असलेल्या आकाशगंगा आढळतात.



२) लंबवर्तुळाकृती -
ह्या प्रकारामध्ये लंबवर्तुळाकृती आकार असलेल्या आकाशगंगा आढळतात.



३) अनियमित - 
ह्या प्रकारामध्ये आकाशगंगेला ठराविक आकार नसतो, त्या कोणत्याही वेड्यावाकड्या आकारामध्ये आढळतात.

No comments:

Post a Comment